राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

सोलापूरसह राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उष्णतेच्या लाटेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसस्थानकात विश्रांती घेत असलेल्या एका तरुणाचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. अमोल दामोदर बावस्कर (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. तीव्र उष्णतेच्या झळा सहन न झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटेमुळे पाणी कमी होणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी आणि उष्माघात यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
तापमानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही सूचना दिल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, हलका व पांढऱ्या रंगाचा कपडा परिधान करावा आणि भरपूर पाणी प्यावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.