क्राईम
ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण?

- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी महत्वाचा युक्तीवाद सादर केला. त्यांनी कोर्टात संपूर्ण घटनाक्रम मांडत मुख्य सूत्रधार कोण हे स्पष्ट केले. तसेच आरोपींच्या वकिलांना आवश्यक सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
- बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. यामध्ये निकम यांनी आपला युक्तीवाद सादर करत संपूर्ण प्रकरणाचा क्रम न्यायालयासमोर ठेवला. त्यांनी नांदूर फाटा येथील हॉटेलमध्ये एक डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत यामध्ये वाल्मिक कराड याने आरोपींना मार्गदर्शन केल्याचे सांगितले. निकम यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुले असून त्याला कराडने गाईड केले.
- सीडीआर अहवालानुसार, फरार आरोपी कृष्णा आंधळे याने कराड आणि विष्णू चाटे याच्याशी तीन वेळा फोनवर संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. या घडामोडींच्या आधी घुले याने आवादा कंपनीच्या वॉचमनला मारहाण केल्याचेही निकम यांनी न्यायालयात सांगितले. या युक्तीवादाच्या माध्यमातून संपूर्ण कट कारस्थानाचा धागा उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- निकम यांनी आपली बाजू सशक्तपणे मांडत आता केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी अजूनही कागदपत्रांचा पूर्ण अभ्यास न झाल्याचे सांगून चार्ज फ्रेमिंग पुढे ढकलण्याची मागणी केली.
- या सुनावणीला आरोपींच्या बाजूने विकास खाडे, राहुल मुंडे आणि अनंत तिडके हे वकील उपस्थित होते. आता या खटल्याची पुढील सुनावणी दहा एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. प्रकरणातील पुढील पुरावे आणि युक्तीवाद याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.