खेळ
बिग ब्रेकिंग! टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या तालावर नाचले न्यूझीलंड

- चॅम्पियन ट्रॉफीचा अखेरचा सामना आज रंगतदार झाला. एकवेळ न्यूझीलंडकडे झुकलेला सामना भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आपल्याकडे खेचून आणला. 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 205 धावांत गारद झाला. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन बाद झाल्यानंतर सामन्यावर भारताने पकड निर्माण केली. केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पर्दापणात वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. भारताने यापूर्वीच सेमीफायनल गाठली आहे. आता भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी सेमीफायनल रंगणार आहे.
- 250 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने भक्कमपणे सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने रचिन रविंद्रला बाद करत मोठा अडथळा दूर केला. पहिल्या दहा ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 1 बाद 44 धावा केल्या होत्या. तर वरुण चक्रवर्तीने 12 व्या ओव्हरमध्ये विल यंगला बोल्ड केले. 20 ओव्हरअखेर दोन बाद 80 अशी न्यूझीलंडची अवस्था झाली होती. विल्यमसन आणि डारेल मिचेलमध्ये चांगली भागीदारी होत असताना कुलदीपने मिचेलला बाद केले. त्यानंतर टॉम लॅथमला रवींद्र जडेजाने एलबीडब्लू बाद केले. ग्लेन फिलीप्सला वरुणने एलबीडब्लू करत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. पाच बाद 151 धावा अशी न्यूझीलंडचा अवस्था झाली होती. त्यानंतर वरुणने मायकेल ब्रेसवेलला बाद करत न्यूझीलंडला सहावा झटका दिला. त्यानंतर केन विल्यमसनला अक्षर पटेलने स्टॅम्प करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मिचेल सँटनरने जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्यालाही वरुणने बाद केले. मॅट हेन्ररीला बाद करत वरुणने पाचवी विकेट घेतली.