क्राईम

काय करायचे ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने गाडेचा आत्मविश्वास वाढला

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात नुकतीच 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे याला अटक केली. दरम्यान, आरोपी तरुणीवरच आरोप करताना दिसत आहे. मी तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते, असा दावा गाडे याच्याकडून केला जात आहे. मात्र, या सगळ्या निर्लज्जपणाचे पितळ उघड पाडणारी माहिती समोर आली आहे.

तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा गाडे याने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तिने आरडाओरडा केला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

अत्याचारावेळी गाडे याने आपल्याला जिवंत सोडावे, या एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही. गाडे हा आपण कंडक्टर असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर गाडे याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला.

सगळीकडून बस बंद केल्याने आणि बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून पीडितेने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडे याने तिला सीटवर ढकलून दिले. पिडीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. त्यानंतर गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.

या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले.

यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना तिने गाडे याच्याकडे केली. त्यामुळे गाडे याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने दुसऱ्यांदा तरुणीच्या शरीराचे लचके तोडले.

Related Articles

Back to top button