राजकीय
एक मत मिळवले अन् वाजपेयींचे सरकार पाडले

- केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार फक्त एका मताने पडले होते. या घटनेला आज उजाळा मिळण्याचे कारण म्हणजे वाजपेयी यांचे सरकार फक्त एका मताने कसे पडले याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. निमित्त होते निलेशकुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ या पु्स्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. पवार यांनी आपल्या भाषणात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार फक्त एका मताच्या अभावाने कसे पडले, त्यावेळी नेमकं काय घडले होते याचा खुलासा केला.
- पवार म्हणाले, मी संसदेत विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी एक काम केले. त्यावेळी केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार होते. त्याचवेळी आम्ही या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. ठराव एकमताने मंजुरही झाला. ते एक मत मी मिळवले होते. कसे मिळवले याबद्दल सांगत नाही. ठराव मांडला, ठरावावर चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मतदान करण्यासाठी काही वेळ असतो. त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो. काही वेळाने परत आलो. याचवेळी सत्ताधारी गटातील एका व्यक्तीने वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने सरकार पडले.
- आताचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमुळे फक्त एका मतामुळे वाजपेयी यांचे सरकार पडले होते. लोकसभेच्या सभापतींची यात मोठी भूमिका होती. त्यावेळी हे पद टीडीपीकडे होते. 25 एप्रिल 1999 रोजी जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर विरोधकांनी या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. वाजपेयींना संसदेत बहुमत सिद्ध करायचे होते. 17 एप्रिल 1999 मध्ये या प्रस्तावावर मतदान होणार होते. बसपा प्रमुख मायावती देखील सरकारमधून बाहेर पडल्या होत्या. नॅशनल कॉन्फरन्सचे सैफुद्दीन सोज सुद्धा सरकारच्या विरोधात गेले होते. तरी देखील वाजपेयी सरकारकडे बहुमत होते. परंतु, लोकसभेच्या अध्यक्षांनी काँग्रेस खासदार गिरधर गमांग यांना लोकसभेत मतदानाचा अधिकार दिला. यामुळे सगळं चित्रच पालटले.
- काँग्रेस खासदार गमांग 17 फेब्रुवारी 1999 ला ओडिशाचे मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री असताना गमांग मत देण्यासाठी येणार नाहीत, असा सत्ताधाऱ्यांचा समज होता. परंतु, गमांग अचानक दाखल झाल्याने सगळेच अवाक झाले. प्रकरण लोकसभेचे अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांच्याकडे पोहोचले. त्यांनी सांगितले की, गमांग यांनी आता स्वतःच्या विवेकबुद्धीच्या आधारे मतदान करावे.
- पण गमांग यांनी त्यांच्या पक्षाचा आदेश पाळला आणि केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकार विरोधात मतदान केले. या एका मतामुळे वाजपेयी सरकार पडले. त्यावेळी सरकारच्या बाजूने 269 आणि विरोधात 270 मते पडली होती.