मनोरंजन

शिवजयंतीनिमित्त छावा फेम विकी कौशलची रायगडावर गर्जना

  • छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच छावा फेम अभिनेता विकी कौशल थेट रायगडावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेता विकी चांगलाच चर्चेत असून त्याला प्रेक्षकांसह चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विकीने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी विकी हा रायगडावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विकीने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मला याठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संर्वांना शुभेच्छा देतो. रायगडावर येण्याची संधी मिळावी हे माझे एक स्वप्न होते, दर्शनाची ओढ होती आणि आज महाराजांचे आशीर्वाद मिळालेत म्हणून खूप भारी वाटत आहे, असे विकीने सांगितले. छावा सिनेमात साकारलेल्या भूमिकेबद्दल विकीला विचारले असता तो म्हणाला, सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सोसल्या आहेत, त्यापुढे आमची मेहनत काहीच नाही. त्यामुळे महाराजांची कथा जगासमोर मांडण्याची गरज असल्याचेही मत त्याने व्यक्त केले. दरम्यान सोलापूरसह अन्य भागात छावा चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल्ल आहेत. 

Related Articles

Back to top button