संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण; विष्णू चाटेचा ‘माईंडगेम’

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटे याने त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केलेला नाही. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या फोनमध्ये नक्की कोणते सिक्रेट दडले आहे, असा प्रश्न सीआयडी आणि पोलिसांसमोर आहे.
देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी पाच मोबाइल जप्त केले आहेत. हे सर्व जप्त केलेले मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र, आरोपी चाटे याने मोबाईल न दिल्यामुळे गुढ आणखी वाढला आहे. चाटे याचा मोबाईल अजून सीआयडीला सापडलेला नाही. या प्रकरणी चाटे याचा फोन सापडल्यास अनेक प्रश्नांची उकल होईल, असे पोलीस म्हणत आहेत.
चाटे याने स्वत:चा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, विष्णूने हा मोबाईल नेमका कुठे फेकला? हे पोलिसांनी विचारले असता त्याने ते ठिकाण आठवत नसल्याचे सांगितले. त्यामुळे चाटे याचा मोबाईल सीआयडी यंत्रणेला सापडत नाही. चाटे याच्या मोबाईलवरुनच वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय व्यक्त केला गेला. याच फोनवरून खंडणीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपासात चाटे याचा मोबाईल अतिशय महत्वाचा आहे.
तसेच चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक हा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलला होता. त्याने दोन कोटींच्या खंडणीसोबत हात-पाय तोडण्याची देखील धमकी दिली होती. अशी ऑडिओ क्लिप पोलिसांना सापडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या तपासात चाटे याचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे. पण चाटे हा फोन फेकल्याचे सांगत आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा अजून देखील फरारच आहे.