राजकीय
शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर

- राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अनेक आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. अशात आता आणखी काही आमदार आणि खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरसंदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असे म्हटले होते. त्यानुसार ठाकरे गटासह पुण्यातील काही आमदार हे शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार असे बोलले जात आहे.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटही अधिक सक्रीय झाला आहे. त्यात या निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटासह काँग्रेसलाही धक्का देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.
- सामंत यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. काही माजी आमदार हे सामंत यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामध्ये दोन काँग्रेस नेते आणि चार माजी आमदार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे.