ब्रेकिंग! दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय

महायुती सरकारचा शपथविधी काल पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले. दरम्यान भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेणार आहेत.
उद्यापासून विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रक्रियेचा भाग म्हणून हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. कोळंबकर हे सलग नवव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते राजभवनात दुपारी एक वाजता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
कोळंबकर हे मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हंगामी अध्यक्ष म्हणून ते 15 व्या विधानसभेच्या 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. सात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. कोळंबकर हे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय तसेच कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.