आनंदाची बातमी! HMPV व्हायरस भारतीयांसाठी धोकादायक नाही

चीनमधून आलेला कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगाला जवळपास दोन वर्षे वेठीस धरले होते. मात्र, आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आल्याने संपूर्ण जगावर नवीन महामारीचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पाच वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरत आहे. त्याची लक्षणेही कोरोना व्हायरससारखी आहेत.
या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटान्यूमोव्हायरस आहे, जो RNA विषाणू आहे. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला असून त्यामुळे लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. दरम्यान या व्हायरसचा भारतातील नगरिकांना आणि लहान मुलांना कितपत धोका आहे, याबद्दल साथीच्या आजारांचे तज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी माहिती दिली आहे.
एचएमपीव्ही रोगाचा भारताला फारसा धोका नसल्याचे डॉ. गोडसे यांनी सांगितले. भारतातील नागरिकांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही. चीनमध्ये सध्या नागरिक मास्क घालूनच फिरत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, चीन देशात प्रदूषणाची समस्या मोठी असल्याने तेथील नागरिक कायमच मास्क घालून फिरत असतात. हा व्हायरस हा अत्यंत साधा आहे. कमी किंवा जास्त वय असलेल्या लोकांना हा व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. गोडसे म्हणाले.
लहान मुलांना हा एचएमपीव्ही व्हायरस होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे. भारतात कोरोना काळात चीनसारखा कडक लॉकडाउन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकरक शक्ती चांगली राहिली आहे. त्यामुळे भारतात हा व्हायरस फार पसरेल, असे वाटत नाही, असे डॉ. गोडसे म्हणाले.