नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार सुरक्षित

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल, अशा चर्चा सुरू आहेत. बिहारचे नेतृत्व कुणी करायचे ? यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. तेव्हापासून नितीशकुमार एनडीएमध्ये नाराज असल्याचे बोलल जात आहे. शिवाय नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडले, तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत.
याबाबतचे थेट वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील केले होते. केंद्रात भाजपा नितीशकुमार यांचे दहा खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नितीशकुमार अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येऊ शकते, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. पण राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केले आहे. नितीशकुमार बाहेर पडले तरी केंद्र सरकार सुरक्षित आहे, अशा आशयाचे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जयंत पाटील म्हणाले, नितीश कुमारांकडे एकूण बारा खासदार आहेत. ते बारा खासदार बाहेर गेले तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल, असे दिसत नाही. त्यांच्याकडे सध्या 291 च्या आसपास बहुमत आहे. त्यामुळे नितीशकुमार बाजूला झाल्याने केंद्र सरकार अल्पमतात येईल, असे मला आकड्यांवरून तरी वाटत नाही.