क्राईम

बापरे! जवळच्या व्यक्तीनेच घात केला

बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. देशमुख हत्या प्रकरणात काल सर्वात महत्त्वाची घडामोड घडली असून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली आहे.

आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. जी व्यक्ती संतोष देशमुख यांचा जवळचा म्हणून सांगितले जायचे. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनात जो सहभागी झाला होता. तसेच त्यांच्या अंत्यविधीलाही जो हजर होता. त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचे नाव सिद्धार्थ सोनवणे.

९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांचा ठावठिकाणा आरोपींना कसा लागला, असा मोठा प्रश्न तपास यंत्रणांना पडला होता. ९ तारखेला दुपारी काही कामानिमित्त देशमुख बाहेर गेले होते. त्यानंतर ते मस्साजोगच्या दिशेने निघाले होते. डोणगाव फाट्याच्या पुढे त्यांची गाडी आलेली असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले. पण ही इतकी माहिती आरोपींना मिळाली तरी कशी, ही माहिती पुरवणारा नेमका कोण आहे याचा शोध घेतला जात होता.

दुसरीकडे या हत्येच्या प्रकरणानंतरही सोनवणे हा गावातच थांबला होता. सोनवणे हा मयत देशमुख यांचा निकटवर्तीय सहकारी होता. त्यामुळे त्याच्यावर संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, बीड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारकाईने तपास केला. देशमुख यांचे लोकेशन कुणीतरी जवळच्या व्यक्तीने आरोपींना दिल्याची कुणकुण पोलिसांना याच तपासा दरम्यान लागली. हा लोकेशन देणारा व्यक्ती गावातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला.

पोलीस तपास करत असल्याची कुणकुण लागताच सोनवणे गावातून फरार झाला. त्याने थेट मुंबई गाठली. इकडे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. गावातून फरार होताच त्याचा नक्कीच काहीतरी रोल आहे, याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार तपासाला दिशा मिळत गेली. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

इकडे त्याने थेट मुंबई गाठली. आपले लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी त्याने पाच सिमकार्ड वापरली. तरी देखील पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढलेच. मग वेळ न दवडता सापळा लावण्यात आला. एका मोकळ्या मैदानातील उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी सोनवणेवर झडप घातली. तिथून त्याला उचलले अन् थेट केजला घेऊन आले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Back to top button