राजकीय

ब्रेकिंग! शालेय गणवेशानंतर आता ‘नियम’ बदलणार ?

अलीकडे माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यावरुन, केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती, असे म्हटले होते. 

आता, केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी व्हावे, शिकताना प्रत्येक पुस्तकात त्या त्या विषयाच्या संदर्भातील नोंदी करता याव्यात, यासाठी केसरकर यांच्या कार्यकाळात पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व सरकारी अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात आली होती.

ज्यात या निर्णयाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने या संदर्भातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्यात आली होती. यामुळे सरकारवर आर्थिक भारदेखील पडला होता. 

दुसरीकडे या निर्णयाच्या माध्यमातून पुस्तकासाठी असलेल्या कंत्राटदारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला होता. त्यामुळे अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. वह्यांची पाने जोडल्याने विद्यार्थ्यांत विविध विषयांची नोंद करणे, तसेच त्यासंदर्भातील आकलन क्षमता वाढल्याचे निष्कर्ष समोर आले होते. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत झाले होते.

दरम्यान, आता पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचार झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात छपाई करून बाजारात विक्रीसाठी असलेले व बालभारतीकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, बालभारतीला नव्या निर्णयानुसार मोठ्या प्रमाणात नवीन पुस्तके छापावी लागतील. त्यामुळे याचा आर्थिक भारदेखील विभागावर पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button