ब्रेकिंग! केंद्रात राजकीय भूकंप?
गेल्या आठ दिवसांपासून केंद्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले एक विधान याला कारणीभूत ठरले आहे. आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढल्या जातील, हे आम्ही बसून ठरवू, असे वक्तव्य शहा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात केले होते. यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेतले जाईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
कारण महाराष्ट्रात भाजपाला चांगले संख्याबळ मिळाल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांना साइडलाईन करत देवेंद्र फडणवीसांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे. ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती, त्याच शिंदे यांचे भाजपाने डिमोशन केले आहे. महाराष्ट्रात झालेला हाच प्रयोग आगामी काळात बिहारमध्ये पाहायला मिळू शकतो. यामुळे एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार एनडीतून बाहेर पडले तर केंद्रात राजकीय भूकंप होऊ शकतो, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी नितीश कुमार पुन्हा कोलंटउडी मारू शकतात, अशाही चर्चा आहेत.
दरम्यान चर्चा होण्याचे कारण म्हणजे नितीश कुमारांबाबत दोन दिवसांपूर्वी आलेली बातमी. २० डिसेंबरला नितीश कुमार यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याचे सांगण्यात आले. यानंतर नितीश कुमारांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.
- एकीकडे शहा यांचे आलेले विधान, त्यानंतर अचानक नितीश कुमारांची बिघडलेली तब्येत आणि त्यांचे या सगळ्यावर असलेले मौन पाहता, ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील नितीश कुमार यांनी अशाप्रकारे मौन साधत अनेक भूकंप घडवून आणले आहेत.