देश - विदेश
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार?

- भारत आणि पाकिस्तानातील युद्धविराम आज संपणार आहे का ? 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत 18 मेपर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा करार झाला होता का? आज पुन्हा दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या कोट्यावमधी भारतीयांच्या मनात आहेत.
- मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे थेट इंडियन आर्मीकडून मिळाली आहेत. आज युद्धविराम संपणार, या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण इंडियन आर्मीने दिले आहे. भारत, पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही. 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- दरम्यान पाकचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अलीकडेच सिनेटला सांगितले की, 14 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम वाढवण्यासाठी एक करार झाला. ते म्हणाले की, दहा मे रोजी पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम 12 मेपर्यंत वाढवण्यात आली. 12 मे रोजी पुन्हा चर्चा झाली आणि ती 14 मेपर्यंत वाढवण्यात आली. 14 मे रोजी झालेल्या चर्चेत युद्धविराम 18 मेपर्यंत वाढवण्याचा करार झाला, असे ते म्हणाले होते.
- 18 तारखेला भारत- पाकमधील युद्धविराम संपणार आणि पुन्हा संघर्षाची शक्यता आहे, अशा बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र, त्यावर इंडियन आर्मीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अशी कोणत्याही पद्धतीची चर्चा झालेली नव्हती. तसेच भारत-पाक या दोन्ही देशांचे डीजीएमओ आज पुन्हा चर्चा करतील, अशा पद्धतीची चर्चाही रंगू लागली होती. मात्र, अशा पद्धतीची कोणतीही नियोजित चर्चा आज नाही, असेही इंडियन आर्मीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.



