राजकीय
शरद पवार यांच्या शिलेदाराचा अत्यंत गंभीर आरोप
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व हडपसर मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरुन हॅक केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्री प्लॅन करून आमचा पराभव करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.
- पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह महत्वाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला असीम सरोदे, हडपसर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार प्रशांत जगताप, कॅन्टोन्मेंट विधानसभा अविनाश बागवे, शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार दत्ता बहिरट, खडकवासला विधानसभा मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके आदी उपस्थित होते. या बैठकीत जगताप यांनी हा आरोप केला आहे.
- जगताप म्हणाले, ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला आहे. ईव्हीएम हॅक करुन, सेट करुन आमचा पराभव करण्यात आला आहे. यासाठी प्री प्लॅन करण्यात आला होता. हे सर्व जाणीवपूर्वक घडवण्यात आले आहे. इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आले आहे. या मशीनमध्ये पक्षचिन्ह व उमेदवारांचे चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे कोणते चिन्ह लोड केले हे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे या मशीनवर आम्हाला संशय आहे. या मशीनला खास प्रोग्राम देण्यात आला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत हे मशीन काम करेल. या मशीनमध्ये टाइमिंग सेट केला आहे. त्यामुळे ईव्हीएममधील घोळ समोर येणार नाही.