ब्रेकिंग! महाविकास आघाडीत राजकीय भूकंप?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाने पराभवाची कारणे शोधण्यसाठी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. यामध्ये पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे देताना ईव्हीएमवर सर्वात आधी खापर फोडले. त्यानंतर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी आपली कामे केली नसल्याचा आरोप अनेकांनी केला.
त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू, असे म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र ठाकरे गटाने मदत न केल्याचा आरोप काँग्रेसकडूनही होत आहे.
याबाबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आता पुढील काही महिन्यातच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा सूर ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे.