बिग ब्रेकिंग! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. तर आता ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली. या मतदारसंघात यंदा कमळ फुलले. महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी एक लाख 41 हजार 725 मते मिळवत विजय साकारला. ठाकरे गटाचे उमेदवार बडगुजर यांचा 68 हजार 177 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत बडगुजर यांना एकूण 73 हजार 548 मते मिळाली. तर मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी 46 हजार 649 मते घेतली. यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मयत व्यक्तींच्या नावानेही मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
यानंतर पराभूत उमेदवार बडगुजर यांनी स्वतः पुढाकार घेत ईव्हीएम मशीनमधील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. बडगुजर यांनी या निकालावर आक्षेप घेतला आणि फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानेही याची दखल घेत ही मागणी मान्य केली आहे. यानंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना तसे पत्र दिले आहे.



