शिक्षकाचे संतापजनक कृत्य

देशात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा घटनेतील दोषींविरोधात कठोर पावले उचलली जात असताना गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे प्रकरण दौसा जिल्ह्यातील बल्हेरी पोलीस ठाण्यात आहे. या घटनेबाबत बल्हेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी हनुमान सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षक अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य करायचा. याबाबत एका विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीसह शाळेतील अन्य चार मुलींना शिक्षकांनी अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य केल्याची तक्रार पोलिसांत दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्राम मीना असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. विश्रामने सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या कार्यालयात बोलावून अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या निष्पाप विद्यार्थिनींचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.