उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाचे वचन देऊन चार वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने राठोड यांच्यावर केला आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आज राठोड त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
लग्नाचे वचन देऊन चार वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत महिलेने पोलीस ठाण्यात राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनी राठोड यांच्या वकिलांनी अटकपूर्ण जामीन मिळावा यासाठी सीतापूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राठोड यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान दावा केला होता की, फिर्यादीने चार वर्षांनंतर हा खटला दाखल केला होता. राठोड यांना या प्रकरणात खोटे गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही म्हटले होते. मात्र, 23 जानेवारी रोजी सुनावणी करताना एमपी-एमएलए न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळली होती. न्यायाधीश राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने राठोड यांचा अटकपूर्व जामीनावरील सुनावणीनंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तसेच आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला होता. मात्र त्याआधीच राठोड यांना अटक करण्यात आली.