महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा काल मुंबईमध्ये पार पडला. विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज यांनी विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित केली. याचे उदाहरण देताना त्यांनी मनसेचे पराभूत आमदार राजू पाटील यांच्या गावामध्येच त्यांना शून्य मतदान झाल्याचा दावा केला. मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांचा हा दावा खोडून काढला आहे.
मनसेच्या मुंबईमधील मेळाव्यात बोलताना राज यांनी राजू पाटील यांच्या मतदारसंघाचा उल्लेख केला होता. राजू पाटील यांचे एक गाव आहे. पाटलांचेच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होते. 1400 लोक त्या गावात राहतात. मात्र त्या गावातून पाटील यांना एकही मत मिळाले नाही, असे ते म्हणाले होते. आता राज यांचा हा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने खोडून काढला आहे.
कल्याणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेला कुठे ही शून्य मतदान नाही. राजू पाटील यांच्या गावात मनसेला आघाडी आहे. पराभव कसा झाला? याची चर्चा केली पाहिजे. उगाच कोणीतरी राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.