केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी, असे मोदी यांनी म्हटले. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी उर्जा देईल, असेही मोदी यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मोदी संसद भवनात पोहोचले. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना मोदींनी म्हटले की, देवी लक्ष्मीचे स्मरण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. मी लक्ष्मीला प्रार्थना करतो की देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी. मोदींनी यातून सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.
देशातील जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. तिसऱ्या कार्यकाळाचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. मिशन मोडमध्ये काम करणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताला नवी ऊर्जा देईल. 2047 मध्ये स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा हा अर्थसंकल्प देशाने विकसित भारतासाठी घेतलेल्या संकल्पात नवा आत्मविश्वास निर्माण करेल. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी हा संकल्प पूर्ण करू, असे मोदी म्हणाले.