केंद्र सरकारने यूपीआयच्या नियमांत मोठा बदल केला आहे. NPCI ने UPI पेमेंटच्या मर्यादेत वाढ करून आता दहा लाख रुपये प्रतिदिन अशी केली आहे. यासह अन्य काही कॅटेगरीतही पेमेंट लिमिटमध्ये बदल केले आहेत. आजपासून या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. याआधी यूजर दर दिवसाला दोन लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकत होता. आता मात्र लिमिट वाढवण्यात आले आहे. या नव्या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्य माणसांवर होणार आहे. कारण सरकारचे हे बदल देशातील सर्वसामान्य व्यापारी, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि ज्वेलरी खरेदीशी संबंधित आहेत. परंतु, यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या पेमेंटच्या नियमांत बदल झालेला नाही.
यूपीआयच्या माध्यमातून पेमेंटच्या मर्यादेत वाढ करण्यामागे खास कारण आहे. सरकारने हा निर्णय काही खास पर्सन टू मर्चंट देवाणघेवाणीत वाढ करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. पर्सन टू पर्सन पेमेंटच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही.
कोणत्या कॅटेगरीमध्ये पेमेंटच्या लिमिटमध्ये काय बदल झाला आहे, याची माहिती घेण्याआधी पर्सन टू पर्सन आणि पर्सन टू मर्चंट या संकल्पना काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. पर्सन टू मर्चंटचा सरळ अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यापाऱ्याला केलेली पेमेंट. या पेमेंटची मर्यादा आधी दोन लाख रुपये प्रति दिवस अशी होती. आता यात आठ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती एखाद्या व्यापाऱ्याला एका दिवसात दहा लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतो.
जर एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवत असेल तर त्याला पर्सन टू पर्सन म्हटले जाते. याची मर्यादा आधी एक लाख रुपये होती. आताही तितकीच आहे. यात कोणताही बदल झालेला नाही.