अनैतिक संबंधातून वाद, तरुणाने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढला

Admin
2 Min Read
  1. राज्यात एका घटनेत अनैतिक संबंधातून वाद होऊन तरुणाने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढला. अनैतिक संबंधांतील वादातून झालेल्या खून प्रकरणातील संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  2. नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून पसार झालेल्या दोघांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रफुल्ल दिलीप कांबळे व योगेश बाळासाहेब जाधव (दोघे रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
  3. दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, संतोष अशोक काळे (रा. इंदिरा गांधी वसाहत क्र. 01, शिवाजी चौक, सिडको, नाशिक) या तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. हा खून त्याची पत्नी पार्वती हिने तिचा प्रियकर प्रफुल्ल याच्यासह कट रचून केला होता. गुन्ह्यानंतर प्रफुल्ल आपल्या साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती मिळाली होती. याबाबत नाशिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व उपनिरीक्षक संतोष फुंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना माहिती दिली.
  4. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विष्णु भागवत, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करण्यात आले. दरम्यान, पथकाने शनिवारी माहितीच्या आधारे शोध मोहिम राबवली. दरम्यान, प्रफुल्ल हा नवनाथनगर रस्ता, बोल्हेगाव गावठाण येथे थांबलेला आढळून आला.
  5. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचा साथीदार योगेश जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
Share This Article