विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडले?
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात उद्या मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
विरोधकांनीही आता ही संधी साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तावडे यांच्याकडे 15 कोटी होते, अशी आपल्याकडे माहिती आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यातले पाच कोटी पकडले गेले आहेत. तावडेंची टीप भाजपच्याच बड्या नेत्याने दिल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. भविष्यात तावडे आपल्याला डोईजड जातील म्हणून त्यांचा ठरवून गेम करण्यात आला, असेही राऊत यांनी सांगितले.
या घटनेनंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने आता कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासापोरा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्या समोर आहे. आता भाजपवाले खुलासे कसले करता. त्यांचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा खेळ संपला.
पक्षाचा राष्ट्रीय महासचिवच पैसे वाटताना पकडला गेला आहे. त्यांच्याकडे पाच कोटी सापडले. त्याचे वाटप त्यांनी केले. त्याचवेळी त्यांना पकडले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पैसे जप्त केले. काहींनी त्यांच्या तोंडावर पैसे फेकल्याचेही दिसत असल्याचे राऊत म्हणाले.