मी CM पदाच्या शर्यतीत नाही; फडणवीस-अजितदादांनंतर शिंदेंनीही केले क्लिअर

विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती.
परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले होते.
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
आमच्यात कोणतीच स्पर्धा नाही. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. राज्याला पुढे नेण्याची आमची स्पर्धा आहे. राज्याला पुढे नेणे, कल्याणकारी योजना राबवणे. आता राज्याला नंबर एकवर आम्ही आणले आहे. राज्यात विकासाचे विकेंद्रीकरण करणे, विभागनिहाय राज्याचा विकास करणे यासाठी आमची स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निवडणुकीनंतर एकत्रित बसून काय तो निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.