शरद पवारांच्या नेत्याने 25 लाख मागितले
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आले आहेत. दरम्यान अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार आणि तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप केला. त्यामुळे ऐन मतदानाची वेळ आली असतानाच महाविकास आघाडीत मोठा गोंधळ उडाला आहे.
ठाकूर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वऱ्हाडे माझ्याकडे 25 लाख रूपये मागत असून ब्लॅकमेल करत आहेत, असे ठाकूर म्हणाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परंतु हे सर्व आरोप वऱ्हाडे यांनी फेटाळून लावले आहेत.
यापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना निवडून आणले. त्यावेळी त्यांनी पैशांची मदत मागितली होती, ती सुद्धा केली. आता काल-परवा त्यांनी (सुनील वऱ्हाडे) मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे 25 लाख रुपयांची मागणी देखील केली. ते व्यापारी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे नेहमीच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका ठाकूर यांनी केली.