राजकीय
फडणवीसांना हरवण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात यंदा सर्वांचे लक्ष लागलेले आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेकडे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
- पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच गुडधे यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून फडणवीसांचा पराभव करण्यासाठी त्यांनी आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यामध्ये गुडधे हे किती यशस्वी ठरतात, हे येणारा काळच सांगेल. परंतु, गुडधे हे फडणवीसांपेक्षा एका गोष्टीत मात्र वरचढ ठरले आहेत.
- नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीने चांगलाच जोर लावला आहे. त्याचीच प्रचिती आता आली आहे. याकरिता गुडधे मोठ्या प्रमाणात खर्च देखील करत आहेत.
- निवडणूक आयोगाने मागवलेल्या माहितीनुसार, गुडधे यांनी त्यांच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील खर्च दाखवला असून हा खर्च फडणवीसांनी खर्च केलेल्या रकमेच्या चौपट आहे. फडणवीस यांनी प्रचारासाठी आतापर्यंत 64 हजार 136 रुपये खर्च केले आहेत. तर, फडणवीसांचे प्रतिस्पर्धी असलेले गुडधे यांनी आतापर्यंत 2 लाख 99 हजार 581 रुपये प्रचारात खर्च केले आहेत. म्हणजेच फडणवीस यांच्या खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीपेक्षाही जास्त आहे.