मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही
सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सध्या सभांचा धडाका लावला आहे. ते सध्या मराठवाड्यातील मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यामुळे सर्वच जण अवाक झाले आहेत. तरुणांनाही लाजवेल, अशी धडाडी वयाच्या 84 व्या वर्षीही पवार दाखवत आहेत. त्यामुळे तरूणी त्यांच्या सभांना मोठी गर्दी करत असताना दिसत आहेत. परांडा विधानसभा मतदारसंघात पवार प्रचाराला आले होते. त्यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवारांना या वयातही तुम्ही हिंडत आहात, अशी विचारणा केली. त्यावर पवारांनी मी काय म्हातारा झालोय का? असा प्रतिप्रश्न ओमराजेंना विचारला. त्यानंतर सभाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.
परांडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राहुल मोटे हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पवार आले होते. त्यावेळी काळजी म्हणून ओमराजेंनी पवारांना तुम्ही या वयातही हिंडत आहात, अशी विचारणा केली. त्यावर सभेला संबोधित करताना पवार म्हणाले, ओमराजे माझ्या तब्बेतीविषयी विचारत होते. या वयातही तुम्ही हिंडत आहात, असे विचारले. मी म्हणतो, मी काय म्हातारा झालोय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
पवार पुढे म्हणाले की, मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. या महायुतीच्या लोकांना घरी बसवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक होताना जोपर्यंत आमचे सरकार करत नाही, तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही.