राजकीय

ठाकरे गटाचे चालले आहे तरी काय?

सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने एका मतदारसंघात चक्क भाजप उमेदवारालाच पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. तसे लेखी पत्रकच काढण्यात आले आहे. शिवाय या पत्रावर मतदारसंघातल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्याही आहेत. हे पत्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे सध्या चालले आहे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजपने गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसने येथे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे ठाकरे गटाचा काँग्रेसला पाठिंबा अपेक्षित होता. मात्र येथे झाले भलतते. भाजप उमेदवार पडळकर यांना जत युवा सेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

तसेच त्याबाबतचे पत्रकही काढण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत जतच्या युवा सेनेला काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच पडळकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे युवा सेनेने स्पष्ट केले आहे. ज्ञानेश्वर धुमाळ यांनी हे पत्रक काढले आहे.

या पत्रकानंतर महाविकास आघाडीत जत विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या सांगली जिल्हा प्रमुखांना पुढे येत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. कोणत्याही पदावर नसताना धुमाळ यांनी जुने लेटरहेड वापरून पाठिंब्याचे पत्र काढले आहे. लेटरहेड वापरून बोगस पाठिंबा दिल्याप्रकरणी धुमाळ व इतरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे विभूतेंनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button