ब्रेकिंग!…तर राजकीय विरोधकांना ताकद दाखवून देऊ

सिध्देश्वर साखर कारखाना, सिध्देश्वर देवस्थान, कॉलेज यासह सिध्देश्वर परिवारातील संस्थांना राजकीय मंडळी पध्दतशीरपणे त्रास देत आहेत. हा त्रास संपवायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ही राजकीय कोंडी फोडावी लागेल. या माध्यमातून सिध्देश्वर परिवारातील संस्थांना त्रास देणाऱ्या मंडळींना बाजूला हटवून आपला प्रतिनिधी निवडून पाठवावा लागेल, असे सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी सभासदांना म्हणाले.
कारखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. त्यावेळी काडादी बोलत होते. प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सभासदांचे स्वागत कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी यांनी केले.
ज्यावेळी उसाचा दर जाहीर केला. त्यावेळी बाजारातील साखरेचा दर प्रतिक्विंटल 3600 रुपये, बी हेवी मोलॅसीसचे दर प्रतिटन 13 हजार ते 14 हजार आणि याद्वारे तयार करण्यात आलेल्या रेक्टीफाईड स्पिरिटसाठी प्रतिलीटर 56 ते 57 रुपयांचा दर होता. बाजारातील या दरांचा विचार करून कारखान्याने ऊसदर जाहीर केला होता. परंतु 15 डिसेंबर 2023 पासून पूर्वसूचना न देता केंद्र सरकारने नवे धोरण स्वीकारले. त्यामुळे प्रतिक्विंटल साखरेचे दर 400 ते 450 रुपयांपर्यंत कमी झाले. बी हेवी मोलॅसीस व स्पिरिटचे दरही खाली आले. त्यामुळे कारखान्यावर आर्थिक ताण निर्माण झाला. सहवीज निर्मितीतून कारखान्याने 11 कोटी 91 लाख 88 हजार 745 इतकी युनिट वीज तयार करून 8 कोटी 36 लाख 83 हजार 262 युनिट विजेची निर्यात केली आहे. त्याद्वारे कारखान्याला 41 कोटी 75 लाख 77 हजार 671 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे श्री. धर्मराज काडादी यांनी सांगितले.