राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये जनतेवर आश्वासनाची लयलूट केली. यावेळी उद्धव यांनी आज भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका करताना राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. महायुतीचे उमेदवार लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत असताना उद्धव यांनी दिलेली आश्वासने गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही महाराजांचे पुतळे नाही उभारणार तर, प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. शिवसेना नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हा पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते, महागाई वाढू दिली नव्हती.
आज मी जाहीर करतोय, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ यासारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवणार. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर, असे ठाकरे म्हणाले.