राजकीय

लढण्याआधीच काँग्रेस चितपट!

  • अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अंतिम क्षणी काँग्रेसला धक्का देत आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सतेज पाटलांकडे उमेदवार बदलण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर पाटील यांनी सूत्रे फिरवून लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळवून दिली. मात्र, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम काही मिनिटांत मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आधीच चितपट झाला व पाटील तोंडघशी पडले.
  • कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसने नवीन चेहरा असलेल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली.
  • या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने मोठा निर्णय घेतला. मधुरिमाराजे यांच्या अर्ज माघारीनंतर आता कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध बंडखोर लाटकर यांच्यात लढत होणार आहे. मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी लाटकर यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना निवडून आणू, असे पटोले यांनी सांगितले. मविआचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नसल्याने लाटकर यांना पाठिंबा देण्यावाचून काँग्रेसकडे दुसरा पर्याय नव्हता.

Related Articles

Back to top button