राजकीय
मधुरिमाराजेंची माघार, काँग्रेसची नाचक्की
- कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर नामुष्की आली. मधुरिमाराजेंच्या या निर्णयामुळे पाटील यांना निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला. दरम्यान, सर्व प्रकारानंतर पाटील यांना बळ देण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी गराडा घातला. कार्यकर्त्यांशी बोलतांना पाटलांना अश्रू अनावर झाले.
- पाटील म्हणाले, माझी कोणाशीही भेट होऊ शकली नव्हती. हे सर्व घडल्यावर भुदरगडमध्ये राहुल देसाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मी त्यांना काँग्रेसमध्ये येण्यास सांगत होतो. त्यांनी 5 ते 6 हजार लोकांचा मेळावा बोलावला होता. मी त्या ठिकाणी न जाऊन त्यांचे खच्चीकरण करणे हे काही बरोबर वाटत नव्हते. त्यामुळे मी दुपारी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी गेलो, जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणार नाही. जे घडले आहे, त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावे, अशी माझी विनंती आहे.
- पाटील म्हणाले, तिथून पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. ती परिस्थिती माझ्या हातात नव्हती. मला अनावर झाले होते. काय घडतंय मला समजत नव्हते. त्यांचा हात धरून थांबवणे मला संयुक्तिक वाटत नव्हते. जे काही घडले ते लोकांसमोर आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला हे मला माहीत नाही. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांनी निर्णय घेतला, त्यात बदल होऊ शकत नाही.