राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात २८८ जागांसाठी जवळपास आठ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपाचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते.
शहा यांनी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. शहा यांच्याकडे २,१७८.९८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे १,१३६.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी बहुतेक संपत्ती शेअर्स आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित स्वरुपाची आहे.
शहा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. शहा यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३१ कोटी तर, पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य ३४.१७ कोटी रुपये आहे. शहा यांच्यावर एक लाख रुपयांचे तर, पत्नीच्या नावावर ३६.९० लाख रुपयांचे कर्ज आहे.
२०१९ शी तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत दहापटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी २३९ कोटी रुपयांची तर, पत्नीच्या नावावर १६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.