ब्रेकिंग! महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पटोले यांनी महायुतीवर घणाघात केला.
महायुती सरकारने प्रगती केली नाही, उलट दुर्गती झाली. महिलांवरील अत्याचार वाढले. महायुती सरकारच्या काळात 38 टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे पटोले म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सहा नोव्हेंबर रोजी मुंबईत काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील महाभ्रष्ट युतीला वाचवण्यासाठी दिल्लीतील नेते येत आहेत.
महाराष्ट्रातील एटीएम वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. आमची चर्चा सुरू आहे. महायुतीत जागावाटपामध्ये गडबड झाल्याने हेलिकॉप्टरने एबी फॅार्म पाठवले आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी ही लढाई आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा नाही. ‘दोस्ती करो तो पुरी करो’ ही आमची भूमिका आहे. महायुतीत भाजप शकुनी सारखे काम करतेय, अशी टीका पटोले यांनी केली.