शिवसेना एक सुंदर स्त्री, मात्र लोक आता….
शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेविषयी बोलताना एका महिलेशी तुलना केली आहे. शिवसेना ही एक सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत. गळ्यात लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल, अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य चिपळूण संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेला जागा मिळाली नसल्यामुळे नाराज झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार चव्हाण हे चिपळूण विधानसभा मतदा संघातून इच्छूक होते. एवढेच नव्हे तर पक्षाच्या दोनवेळा झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातही याविषयीची जोरदार मागणी पक्ष निरीक्षकांसमोर केली होती. त्यानंतर चव्हाण यांना गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. आचारसंहितेच्या तोंडावर चव्हाण यांनी मुंबईत पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. मात्र आता त्यांची संधी हुकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
सुरूवातीपासूनच आपली इच्छा होती. त्यानंतर पक्षाने गुहागरमधून उमेदवारीबाबत विचारणा केली. त्याप्रमाणे आपण पक्षाला तयारीही दर्शवली होती. परंतू आता मतदार संघात शिवसेनेची ताकद असतानाही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असणे साहजिकच आहे. परंतु, आता महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता सर्व ताकदीनीशी उतरून निकम यांच्या प्रचारात योगदान देणार आहेत, असेही ते म्हणाले.