राजकीय
विधानसभेचे तिकीट कापले अन् शिंदेंचे आमदार झाले बेपत्ता
- शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले गेले होते. प्रसारमध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले. उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सोमवारी संध्याकाळी ही सगळी माहिती समोर आली होती. तेव्हापासून वनगा हे बेपत्ता आहेत.
- वनगा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास वनगा एक पिशवी घेऊन घरातून बाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय, हे कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर आता 12 तास उलटून गेल्यानंतर वनगा नेमके कुठे आहेत, याचा पत्ता कोणालाही नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोनही नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. परिणामी वनगा यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
- पालघर विधानसभेसाठी वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, काल संध्याकाळी शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला.