राजकीय

नवा ट्विस्ट! सिद्धी कदमांचा पत्ता कट

शरद पवार गटाने मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द केली आहे. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. काल सकाळी मोहोळ विधानसभेतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पवारांची भेट घेऊन सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. पवार यांनी या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिद्धी यांची उमदेवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी यांना देण्यात आलेला एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले. आता सिद्धी यांच्याऐवजी शरद पवार गटाकडून मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सिद्धी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, आता शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान सिद्धी या वयाने लहान असल्या तरी त्यांना निवडणुकीची प्रचार मोहीम हाताळण्याचा अनुभव होता. सिद्धी यांनी गत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट दिली होती.

विद्यमान आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनाच वडिलांसाठी टक्कर दिली होती. कारण, 2019 साली सिद्धीचे वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत होते, तेव्हा विधानसभा निवडणुकांची धुरा सिद्धीनेच सांभाळली होती.

Related Articles

Back to top button