राजकीय
मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का?

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, सध्या पक्ष बदलण्याचा धडाका इच्छुक उमेदवारांनी लावला आहे. त्यात आता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याही पत्नी आहेत. मात्र सध्या त्या विभक्त राहात आहेत. त्या त्यांचे पती ज्या मतदारसंघातून आमदार होते, त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. हा मतदार संघ महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
- कन्नड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी हर्षवर्धन जाधव यांचा बालेकिल्ला होता. ते या मतदारसंघातून निवडूनही आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता. त्यांच्या पत्नी संजना यांचीही राजकीय महत्वकांक्षा लपून राहिली नाही. मात्र हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्यात वाद होते. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहात आहेत. संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री दानवे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे. कन्नड मतदारसंघातून ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला आहे. संजना या मैदानात असल्यास इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगणार आहे.