कोट्यावधी रूपयांचे घर, महागड्या गाड्या अन् सोनं-चांदी
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काल वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे जाहीर केले. प्रियांका यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, 2023-2024 या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न 46.39 लाख रूपये होते.
प्रियांका पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार नव्या हरिदास या मैदानात आहेत. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
प्रियांका यांच्याकडे 4.24 कोटी किमतीची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये तीन बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या रकमांच्या ठेवी, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, PPF, पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिलेली होंडा CRV कार आणि 1.15 कोटी रूपये किमतीचे 4400 ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. प्रियांका यांची स्थावर मालमत्ता 7.74 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये नवी दिल्लीच्या मेहरौली भागातील दोन वारसाहक्की अर्धा वाटा आणि फार्महाऊस इमारतीतील अर्धा वाटा समाविष्ट आहे.
त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे निवासी मालमत्तेची मालकी आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत सध्या 5.63 कोटी रूपये आहे. त्यांचे पती उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे 37.9 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.