राजकीय
ब्रेकिंग! निवडणुकीत पैशांचा महापूर, महायुतीकडून चार हजार कोटींचा चुराडा होणार

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पैशांचा महापूर आणणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याची चुणूक नुकतीच दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात जे पैसे पकडले हा त्याचाच एक भाग होता. त्या गाडीतून पाच कोटी रूपये जप्त करण्यात आले. ते महायुतीच्या उमेदवारासाठी चालले होते, असा आरोपही त्यांनी केला. पाच कोटी जरी पकडले असले तरी त्या गाडीत पंधरा कोटी होते, अशी माहिती असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती किती कोटींचा खर्च करणार आहे, याचा आकडाच पवार यांनी सांगितला. ते पंढरपुरात आले होते, त्यावेळी बोलत होते.
- राज्यात येत्या निवडणुकीत महायुती चार हजार 800 कोटी रुपयांचा चुराडा करेल. त्यासाठी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे लावले जाणार असल्याचा आरोप पवार यांनी केला. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने प्रत्येक मतदार संघात 100 ते 150 कोटी खर्च केले होते, असा आरोपही पवार यांनी केला आहे. समृद्धी महामार्गातूनही या महायुती सरकारने पैसा कमावला आहे. यातून त्यांनी गुजरातची निवडणूक लढवली. शिवाय आता अडीच वर्षात जवळपास 60 ते 70 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यातून मिळालेला पैसा महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीत वापरला जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला.