राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला काल निश्चित झाला आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष ८५ या समान जागांवर उमेदवार देणार आहेत. तर १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाने आघाडी घेत ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी यात काही बदलही होऊ शकतात, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यानुसार बदलाचे संकेत मिळाले आहेत. धाराशिव जिल्ह्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार आहेत.
ठाकरे गटाच्या धाराशिवमधील उमेदवारांत बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाने येथून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना तिकीट दिले आहे. परंतु, याच जागेसाठी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी दावा ठोकला आहे. त्यांची दावेदारी मागे होईल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे जास्त ताणाताणी नको म्हणून ठाकरे येथील उमेदवारी बदलतील. कदाचित मोटे यांना पक्षात घेऊन त्यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढविली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मोटे तीन वेळा आमदार राहिले आहेत. शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्या विरुद्धही त्यांनी लढत दिलेली आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने पाटील यांचे नाव वगळल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जागी आता मोटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.