राजकीय
बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार?
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अलीकडेच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा थेट संबंध आढळून आला. काही दिवसांपूर्वी सलमान खानला आलेली धमकी आणि त्यानंतर सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही बिश्नोई गँगचाच थेट संबंध असल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणांच्या केंद्रस्थानी असलेले लॉरेन्स बिश्नोई हे नाव सध्या ट्रेंडमध्ये आहे. जेलमधून टोळी चालवत असलेल्या या गुन्हेगाराचे उदात्तीकरण करायलाही आता अनेकजण पुढे येताना दिसतायत. यातलाच एक प्रकार आता समोर आला आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. यातच आता बिश्नोईला एका पक्षाने थेट उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे.
- एका पक्षाने थेट कुख्यात गुन्हेगार बिश्नोईला आपल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. उत्तर भारतीय विकास सेना नावाने नोंदणीकृत असलेल्या एका पक्षाने थेट बिश्नोईला निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे.
- उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी थेट पत्र लिहून बिश्नोईला महाराष्ट्रातून निवडणुकीची ऑफर दिली. शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत निवडणूक लढण्यासाठी आपल्या चार उमेदवारांची यादी फायनल झाली आहे. त्यानंतर आता बिश्नोईच्या परवानगीनंतर उर्वरीत 50 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.