क्राईम

सोन्याच्या दागिन्यांसाठी नातवाने केला आजीचा खून

  • नव्वद वर्षीय आजीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेण्यासाठी नातवाने तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात घडली आहे. गोदाबाई लक्ष्यण जाधव (रा. माळवाडी, अकोळनेर) असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोपट लक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी निलेश बाळासाहेब जाधव (वय-२५) याला ताब्यात घेतले आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीचा खून करून आरोपीने तिच्या कानातील तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. आजीचा मृतदेह घरातील दिवाणमध्ये लपवून ठेवला. सायंकाळी सोशल मिडियावर पोस्ट टाकली की, माझी आजी हरवली आहे. कोणाला दिसल्यास पोस्टमध्ये फोटोखाली संपर्कासाठी त्याचा तसेच कुटुंबातील आणखी दोघांचे मोबाईल नंबर दिले आहेत. त्या नंबरवर संपर्क साधावा. त्याने रचलेल्या बनावामुळे कुटुंबातील सदस्यांनी आजीचा परिसरात बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही.
  • दरम्यान, रविवारी सकाळी दिवाणमधून मुंग्या निघत असल्याचे फिर्यादी पोपट जाधव यांना दिसले. त्यावेळी त्यांनी प्लायवूडचे झाकण उघडले. त्यावेळी त्यांना गोदाबाईचा मृतदेह दिसला. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सोन्याच्या दागिन्यांसाठी आजीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. दुपारी पोपट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निलेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button