यात्रीगण, कृपया ध्यान दे…
प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायक व्हावा, यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी पावले उचलत असते. आता तिकीट आरक्षणासंदर्भात रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता केवळ ६० दिवस आधीच तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून एक नोव्हेंबरपासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. सध्या प्रवाशांना १२० दिवस म्हणजे चार महिने आधी रेल्वेचे तिकीट बुक करता येते. रेल्वे मंत्रालयाने आज हा आदेश जारी केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रवासी सध्या आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी १२० दिवस अगोदर बुकिंग करतात, परंतु एक नोव्हेंबरपासून यात बदल केला जात आहे आणि हा कालावधी कमी करून ६० दिवस केला जात आहे. यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत बुक झालेल्या तिकिटांवर परिणाम होणार नाही.
दिवाळी सणामुळे अनेकांनी आरक्षण सुरू होताच तिकिटे बुक केली असतील. तुम्हीही या यादीत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, रेल्वेच्या या निर्णयाचा परिणाम ३१ ऑक्टोबरपर्यंत बुक झालेल्या तिकिटांवर होणार नाही.