देश - विदेश
व्वारे पठ्ठे! व्हॅनमधून रस्त्यावर थुंकणाऱ्या पोलिसाशी सामान्य माणूस भिडला
रस्त्यावर थुंकणे हा दंडनीय गुन्हा असला तरी अनेक लोकांच्या चुकीच्या सवयी काही जात नाहीत. येता-जाता लोक सर्रास सार्वजनिक ठिकाणी घाण करताना दिसतात. हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस कर्मचारीच असे करू लागले तर…
एका व्हायरल व्हिडिओमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. पोलीस व्हॅनमधून बेधडक रस्त्यावर थुंकणाऱ्या पोलिसाला एक सामान्य माणूस जाब विचारताना व्हिडिओत दिसत आहे. राज्यातील एक ट्रॅफिक सिग्नलवर रेकॉर्ड करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये एक पुरुष आणि एक महिला पोलिसांच्या व्हॅनशेजारी बाईकवरून जाताना दिसत आहेत. बाईकवरील पुरुष बोट उंचावून व्हॅनमधील एका पोलिसाला खडे बोल सुनावत आहे.
तुमच्या अंगावर कोणी थुंकले तर तुम्ही शांत राहाल का, असे हा दुचाकीस्वार व्हॅनमधील पोलिसाला विचारत आहे. पोलीस त्याला दटावण्याचा प्रयत्न करतो.
पण हा माणूस शांत होत नाही. जर कोणी तुमच्यावर थुंकले तर तुम्ही गप्प राहाल का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे सुनावतो. एवढ्यात सिग्नल सुटतो आणि तो माणूस निघून जातो, असे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हॅनमधून थुंकल्याबद्दल पोलिसांना इशारा देणाऱ्या या दुचाकीस्वाराला सलाम. कोणतीही भीती न बाळगता योग्य गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या अशा जास्तीत जास्त लोकांची आपल्याला गरज आहे, असे एका युजरने म्हटले आहे.