सोलापूर (प्रतिनिधी) जागेच्या कारणावरून भावाने व त्याच्या मुलांनी डोक्यात लाकडी दांडक्याचा जोरदार प्रहार केल्याने एकाचा खून झाला.ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील पंजाब तालीम या परिसरात घडली.शहाजान गुलहमीद शेख (वय-५३,रा.उत्तर कसबा,पंजाब तालीम मस्जिद जवळ) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेने या परिसरात खळबळ माजली.विशेष म्हणजे या घटनेत मृत्यू पावलेला तरूण लग्नासाठी नुकताच दौंड वरून आला होता.
या हृदयदावक घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी सलीम शहाजान शेख हे पत्नी आतिफा यांच्या समवेत उत्तर कसबा येथे असलेल्या पंजाब तालीम मशिदीजवळ राहतात. फिर्यादीचे एक मजली घर असून वरील मजल्यावर फिर्यादी व त्यांची पत्नी राहते तर तळमजल्यावर फिर्यादीचे काका शाकीर हमीद शेख,काकू सुलताना आणि चुलत भाऊ शाहिद शेख असे राहतात.
फिर्यादीचे वडील शहाजान व आई शबाना असे दोघे दौंड येथे राहण्यास आहेत.
बुधवारी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असल्याने दोघेही पती-पत्नी दौंड वरून सोलापुरात आले होते. फिर्यादीच्या घराच्या शेजारीच चुलते समीर गुलहमीद शेख व त्यांची पत्नी रेहाना समीर शेख त्यांच्या दोन मुली सोहिला समीर शेख व साबिया समीर शेख तसेच दुसरे चुलते शाबीर गुलअमिद शेख त्यांची दोन मुले साकिब शाबीर शेख व सुफियान शाबीर शेख हे राहतात.
घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडील मयत शहाजान शेख दौंड वरून आल्यानंतर या सर्वांनी मिळून जागेच्या प्रश्नावरून चर्चा सुरू केली.
यात काका समीर शेख व शाबीर शेख यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीने शिवीगाळ कशाला करता असे म्हणत असताना शाबीर शेख,समीर शेख,सुफियान शेख व साकीब शेख यांनी घरातून लाकडी दांडके घेऊन फिर्यादीस, फिर्यादीचे वडील शहाजान शेख व काका शाकीर शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.या मारहाणीत साकीब व सुफियान यांनी वडिलांना लाकडी दांडक्याने पाठीवर मानेवर डोक्यावर जोरात मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मारहाणीत शहाजान शेख हे जागेवर चक्कर येऊन खाली पडले. त्यावेळी काका शाकीर व चुलत भाऊ शाहिद हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असताना समीरची पत्नी रिहाना व शाबिरची पत्नी मेहरून यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. बेशुद्ध पडलेल्या शहाजान शेख व काका शाकीर यांना तात्काळ उपचार करता शासकीय रुग्णालयात दाखल केले.दरम्यान शहाजान शेख हे बेशुद्ध असल्याने त्यांना तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून शहाजान शेख हे मयत झाल्याचे सांगितले.
या याप्रकरणी फिर्यादी सलीम शहाजान शेख (वय-३०,रा. उत्तर कसबा,पंजाब तालीम मस्जिद जवळ) यांनी चुलते शबीर शेख,समीर शेख,चुलत भाऊ साकीब,सुफियान, समीरची पत्नी रिहाना व शाबिरची पत्नी मेहरून (रा.उत्तर कसबा पंजाब तालीम मस्जिद जवळ) यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे करत आहेत.