राजकीय

…तर तुम्हाला गोळ्या घालेन

नेहमी रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते नितीन गडकरी हे कायमच चर्चेत असतात. आताही ते अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना सरकारी अधिकारी काम करत नव्हते. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना काम करुन घेण्यासाठी धमकावले होते. मी पूर्वी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा मी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन, असा सज्जड दम आपण सरकारी अधिकाऱ्यांना भरल्याचा भन्नाट किस्सा गडकरी यांनी सांगितला. ते नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा गडकरी यांनी उपस्थितांना सांगितला. त्यांनी म्हटले की, त्यावेळी डॉ. अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी मी राजदूत दुचाकीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरलो. तेथील रस्त्यांची परिस्थिती खराब होती. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्ते बांधायचे काम करुन देत नव्हते. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले. एवढी लहान मुले कुपोषणाने मरत आहेत, तुम्हाला काही वाटत कसे नाही? तुम्ही रस्ते बांधायला परवानगी का देत नाही?, असे जोशींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले.
त्यानंतर मी जोशी यांना म्हटले की, तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा, मी बघतो काय करायचंय ते. त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो. मी चुकून राजकारणात आलो. परंतु, आता मी पुन्हा नक्षलवादी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत जे जे केले, ते इकडे सांगू शकणार नाही. या सगळ्यानंतर मेळघाटातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले, असे गडकरी यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button