अशा फालतू बातम्या कशाला?
टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या निमित्ताने चर्चेत आहे. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. शमीच्या पुनरागमनाच्या बातम्या येत होत्या, मात्र आज अचानक शमीला नवीन दुखापत झाली असून त्याच्या पुनरागमनाला उशीर होऊ शकतो, असा दावा काही वृत्तपत्रांमधून करण्यात आला.
या नव्या दुखापतीमुळे शमी आणखी सहा ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहू शकतो, त्यामुळे आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शमीचे खेळणे संशयास्पद आहे, अशा बातम्या मीडियामध्ये येत होत्या.
पण आता या सर्व बातम्यांवर शमीचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. दुखापतीच्या बातम्यांवरून तो चांगलाच संतापला आहे. आपले मौन तोडत त्याने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
शमीने त्याच्या दुखापतीशी संबंधित बातमी सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले, की अशा निराधार अफवा कशासाठी? मी कठोर परिश्रम करत आहे आणि दुखापतीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय किंवा मी बॉर्डर गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे सांगितलेले नाही. मी लोकांना विनंती करतो की, अनधिकृत स्त्रोतांकडून येणाऱ्या अशा बातम्यांकडे लक्ष देणे थांबवावे आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नका. विशेषतः माझ्या विधानाशिवाय.